अवैध अतिक्रमणाच्या नावाखाली ८० दुकाने तोडुन प्रशासनाने केला अन्याय
एक वर्षानंतरही पीडित दुकानदारांचे पुनर्वसन नाही ; कन्हान हॉकर्स संघा व्दारे तीव्र निषेध.
कन्हान : - कन्हान - पिपरी नगर परिषद प्रशासनाने शहरातील महामार्गालगत आनंद रेस्टोरेंट ते होम पाईप कंपनी गेट पर्यंत सुमारे ८० दुकाने तोडण्याची कारवाई केल्याने शेकडो कुटुंबांचे संसार उध्वस्त झाल्याचा आरोप पीडित दुकानदारांनी केला आहे . ही कारवाई (दि.४) जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली होती . या दुकानांच्या माध्यमातुन गेल्या ३० ते ४० वर्षांपासुन स्वरोजगार करून अनेक कुटुंबे आपली उपजिविका भागवत होती . मात्र या कारवाईमुळे एकाच दिवशी शेकडो नागरिक बेरोजगार झाल्याचे चित्र निर्माण झाले .
पीडित दुकानदारांचा आरोप आहे की , ही कारवाई भांडवलदारांना लाभ मिळावा या उद्देशाने करण्यात आली असुन शोषित - वंचित घटकांतील नागरिकांना जाणीवपुर्वक बेरोजगार करण्याचा हा प्रकार आहे . या संदर्भात खासदार व आमदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली , मात्र आजतागायत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही , असा आरोप दुकानदारांनी केला आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही संबंधित ८० दुकानदार कुटुंबांचे भविष्य अद्यापही अंधारात आहे . ज्या ठिकाणी दुकाने होती , त्या जागेवर आज ही गिट्टी, बोल्डर व मलबा तसाच पडुन आहे . यावरून प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसुन येत असल्याची भावना पीडितांनी व्यक्त केली .या अन्यायाच्या निषेधार्थ संबंधित ठिकाणी पोस्टर लावुन शांततामय आंदोलन करण्यात आले .
या पोस्टरमधुन प्रशासनाला काही थेट प्रश्न विचारण्यात आले . यात "प्रशासन केवळ श्रीमंतांसा ठीच आहे काय ? शोषित - वंचितांना जगण्याचा अधिकार कधी मिळणार ? पिढ्यानपिढ्या वंचित राहणाऱ्या घटकांना कधी न्याय मिळणार ? " असे प्रश्न उपस्थित करण्यात आले . निषेध आंदोलना अंतर्गत चिराल वैद्य यांच्या हस्ते त्या ठिकाणी पूजा - अर्चना करण्यात आली . तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना मिठाई वाटुन शांततामय पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला . या माध्यमातुन प्रशासनाने आपल्या जबाबदाऱ्या व संविधानाच्या प्रस्तावनेतील मूल्यांची जाणीव ठेवावी , अशी मागणी करण्यात आली.
तसेच पीडित दुकानदारांच्या वतीने प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत . पीडित दुकानदारांना तातडीने न्याय देण्यात यावा , त्यांचे पुनर्वसन किंवा पर्यायी रोजगाराची व्यवस्था करण्यात यावी. प्रशासनाने केलेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. या आंदोलनात कन्हान हॉकर्स संघ सहभागी असुन जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा ही देण्यात आला आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर

COMMENTS