टेकाडी परिसरात २४.२५० किलो गांजा जप्त |
दोन आरोपी अटक ; ५,३४,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी बसस्थानक परिसरात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत २४.२५० किलो अमली पदार्थ (गांजा) रंगेहाथ जप्त केला . या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३४ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
गुरुवारी (दि.७) जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता च्या दरम्यान अमली पदार्थ विरोधी कारवाई पथक कन्हान उपविभागात नागपूर–जबलपूर मार्गावर पेट्रोलिंग करत असतांना टेकाडी उड्डाण पुलाजवळील हनुमान मंदिर बसस्टँड परिसरात दोन इसम ट्रॉली बॅग घेऊन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळून आले . पोलीसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली ओडिशातून चित्रकूट (उत्तर प्रदेश) येथे जात असल्याचे सांगितले.
या बाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना देण्यात आली. त्यानंतर फॉरेन्सिक पथक व कन्हान पोलिस ठाण्याच्या पथकासह ते घटनास्थळी दाखल झाले . पंचासमक्ष दोन्ही संशयितांच्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये २४.२५० किलो गांजा आढळून आला.
पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपी १) अमित रामदीन रयकवार (वय ३४, रा. ग्राम करवी, ता. करवी, जि. चित्रकूट, मूळ रा. मुसिवाल, बांदा, उत्तर प्रदेश) व २) अमितेंद्र ऊर्फ जियू जयकिरणसिंह (वय २८, रा. एच.पी. पेट्रोल पंपजवळ, यादव डेरा, ग्राम पैलानी डेरा, ता. पैलानी, जि. बांदा, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले . आरोपींकडून २४.२५० किलो गांजा (किंमत अंदाजे ४,८५,००० रुपये), तीन अँड्रॉईड मोबाईल (४५,००० रुपये) व इतर साहित्य (४,६२० रुपये) असा एकूण ५,३४,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
या प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी दिनेश अजाबराव गाडगे (अमली पदार्थ कारवाई पथक) यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिस ठाण्यात आरोपीं विरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब)(२)(क), २२, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही कारवाई नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक अनिल मस्के व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजितसिंग देवरे, पोउपनि प्रविण भिमटे, पोहवा दिनेश गाडगे, प्रविण देव्हारे, प्रकाश ठोके, अमृत किंगे, नापोशी अमोल नागरे, पोशी तुषार गजभिये, अनिल खरडकेले आदींनी यशस्वीरीत्या पार पाडली.
24.250 kg of marijuana seized in the Tekadi area.
सह संपादक - ऋषभ बावनकर

COMMENTS